sharadmani

सोमवार, नोव्हेंबर १६, २००९




पाकिस्तानी शाळकरी मुलीची दैनंदिनी







(सुमारे दोन महिन्यांपूर्वी पाकिस्तानच्या वायव्य भागातील स्वात जिल्ह्य़ातील सर्व खाजगी शाळा बंद करण्याचा फतवा तालिबानने काढला होता. खाजगी शाळांमधून चालणाऱ्या मुलामुलींच्या सहशिक्षणाला तालिबानचा विरोध आहे. तालिबानच्या दहशतवाद्यांनी, त्यांच्या मतानुसार त्यांना वाटणाऱ्या इस्लामी शरियत कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याच्या प्रयत्नात गेल्या वर्षभरात जवळपास १५० खाजगी शाळा उद्ध्वस्त केल्या होत्या. पाकिस्तान सरकारने शैक्षणिक संस्थांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्याकडे विनंती केल्यानंतरही पाच शाळा तालिबान्यांनी नुकत्याच उडवून दिल्या. स्वात परिसरातील सातवीत शिकणाऱ्या एका शाळकरी मुलीने या गदारोळामुळे तिच्यावर तिच्या शाळेतील मैत्रिणींवर काय बेतले आहे, ते तिच्या दैनंदिनीत लिहिले आहे. गुल मकाई या बदललेल्या नावाने हे लिखाण प्रथम बी.बी.सी.च्या उर्दू संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले. त्या दैनंदिनीतील संपादित भागाचा पूर्वार्ध)




शनिवार, जानेवारी : मी खूप घाबरले



काल मला खूप भयानक स्वप्न पडले. स्वप्नात मला सैन्याची हेलिकॉप्टरे तालिबानी दिसले. स्वातमध्ये सैनिकी कारवाई सुरू झाल्यापासून मला असलीच स्वप्ने पडत आहेत. मला आईने नाश्ता करून दिला मी शाळेसाठी निघाले. तालिबानने मुलींनी शाळेत जाऊ नये, असा फतवा काढला असल्यामुळे मला शाळेत जायची खूप भीती वाटत होती. वर्गात २७ पैकी फक्त ११च जणी आल्या होत्या. तालिबानच्या फतव्यामुळे पटसंख्या कमी झाली. या फतव्यानंतर माझ्या तीन मैत्रिणी पेशावर, लाहोर रावळपिंडीला त्यांच्या कुटुंबीयांसोबत निघून गेल्या.शाळेतून घरी परत येताना मी एका माणसाचे बोलणे ऐकले. तो म्हणाला, ‘मी तुला ठार मारीन.’ मी माझ्या चालण्याचा वेग वाढवला. थोडय़ा वेळाने पाहते तर तो नेमका माझ्याच मागे चालत होता. नीट पाहिल्यावर लक्षात आले की तो त्याच्या मोबाइलवर बोलत होता त्याची ती दमदाटी पलीकडच्या माणसासाठी होती. मग मला एकदम हायसे वाटले.



रविवार, जानेवारी : मला शाळेत गेलेच पाहिजे



आज सुट्टी आहे. मी आज उशिरा उठले. साधारण दहा वाजता. मी माझ्या बाबांना बोलताना ऐकले. ग्रीन चौकात आणखी तीन प्रेते सापडली, त्याबद्दल ते सांगत होते. मला हे ऐकून अतिशय दु: झाले. सैनिकी कारवाई सुरू होण्यापूर्वी आम्ही मरघाझार, फिझाघाट किंवा कांजू अशा ठिकाणी सहलीसाठी जायचो. पण आता परिस्थिती अशी आहे की गेल्या दीड वर्षांत आम्ही कुठेही सहलीकरता जाऊ शकलो नाही. पूर्वी आम्ही रात्रीच्या जेवणानंतर थोडे चालायला जात असू, पण आता आम्ही सूर्यास्तापूर्वीच घरी येतो. आज मी घरातली काही कामे केली, माझा गृहपाठ केला आणि माझ्या भावासोबत खेळले. पण एकीकडे माझी छाती धडधडत होती, कारण उद्या मला शाळेत जावे लागणार आहे.




सोमवार, जानेवारी : रंगीत कपडे घालू घालू नका



मी शाळेला जाण्यासाठी तयार होत असताना मला अचानक आठवले की मुख्याध्यापिका बाईंनी सांगितले होते की, तुम्ही गणवेश घालू नका आणि शाळेत येताना नेहमीचे कपडे घालून या. म्हणून मी माझ्या आवडीचा गुलाबी फ्रॉक घालायचे ठरवले. शाळेतील इतर मुलीही रंगीबेरंगी कपडे घालून आल्या होत्या. त्यामुळे आम्हाला शाळेत असलो तरी घरी असल्यासारखेच वाटत होते.माझी एक मैत्रीण माझ्याकडे आली म्हणाली, देवाची शपथ घे आणि मला काय ते खरंखरं सांग. आपल्या शाळेवर तालिबान हल्ला करणार आहेत का? सकाळच्या असेम्ब्लीच्या वेळी आम्हाला सांगण्यात आले की, रंगीबेरंगी कपडे घालू नका; कदाचित तालिबानचा त्याला आक्षेप असू शकतो. मी शाळेतून घरी आले. जेवणानंतर माझा शिकवणी वर्ग झाला. संध्याकाळी मी टीव्ही लावला तेव्हा कळले की शकारद्रामधील संचारबंदी १५ दिवसांनंतर उठविण्यात आली आहे. मला खूप आनंद झाला, कारण माझ्या इंग्रजीच्या बाई त्याच भागात राहतात. म्हणजे आता त्या उद्यापासून शाळेत येणार!




बुधवार, जानेवारी : गोळीबार नाही



आम्ही मोहर्रमच्या सुट्टीनिमित्त बुनेर येथे आलो आहोत. मला बुनेर खूप आवडते. इथले पर्वत, इथली विस्तीर्ण हिरवळ मला आवडते. माझे स्वातही तसे सुंदरच आहे; पण तिथे सध्या शांतता नाही. बुनेरला मात्र एकदम शांतता आहे. इथे गोळीबारही नाही आणि भीतीही नाही. आम्ही सर्व खूप आनंदात आहोत.आज आम्ही पीर बाबाच्या दग्र्यात गेलो होतो. तिथे इतरही खूप माणसे होती. लोक तिथे प्रार्थना करण्यासाठी आले होते.. आम्ही मात्र सहलीसाठी आलो होतो. तिथे बांगडय़ा, लॉकेट्स, कानातले अन्य दागिन्यांची दुकाने होती. मला वाटत होते की, काहीतरी घ्यावे, पण काहीच आवडले नाही. आईने तिच्यासाठी कानातली आणि बांगडय़ा घेतल्या.






शुक्रवार, जानेवारी : मौलाना रजेवर गेला काय?



आज शाळेत माझ्या मैत्रिणींना माझ्या बुनेर सहलीविषयी सांगत होते, तर त्या म्हणतात कशा.. आम्हाला तुझ्या बुनेरच्या गोष्टी ऐकण्याचा कंटाळा येतो. आम्ही मौलाना शाह दौरानच्या मृत्यूच्या अफवेबद्दल चर्चा करीत होतो. तो त्याच्या एफ. एम. रेडिओवरून भाषणे करायचा. मुलींनी शाळेत जाण्यावर बंदी त्यानेच तर जाहीर केली होती.काही मुलींच्या म्हणण्यानुसार तो मेला आहे, तर उरलेल्या म्हणाल्या, तसे काही नाही. त्याच्या मृत्यूच्या अफवा उठण्याचे कारण म्हणजे काल रात्री त्याच्या एफ. एम. रेडिओवरून त्याने भाषण केले नाही. एक मुलगी म्हणाली, तो बहुधा रजेवर गेला असेल.शुक्रवारी शिकवणी वर्ग नसल्यामुळे पूर्ण दुपारभर मी खेळतच होते. संध्याकाळी मी टीव्ही लावला तेव्हा कळले की, लाहोरमध्ये स्फोट झाले आहेत. मी मनाशीच म्हणाले की, पाकिस्तानात असे स्फोट का होत आहेत?

बुधवार, जानेवारी १४ : मी कदाचित पुन्हा शाळेत जाऊ शकणार नाही



मी शाळेत जायला निघाले खरी, पण माझे चित्त काही थाऱ्यावर नव्हते. कारण उद्यापासून हिवाळ्याची सुट्टी सुरू होणार आहे. मुख्याध्यापिका बाईंनी हिवाळ्याची सुट्टी जाहीर केली खरी, पण शाळा परत सुरू होण्याची तारीख काही जाहीर केली नाही, असे आज पहिल्यांदाच घडले.पूर्वी शाळा परत सुरू होण्याची तारीख स्पष्टपणे जाहीर करीत असत. आमच्या मुख्याध्यापिका बाईंनी तारीख जाहीर करण्याचे कारण काही आम्हाला सांगितले नाही, पण माझा असा अंदाज आहे की तालिबाननेमुलींच्या शिक्षणावर १५ जानेवारीपासून बंदी जाहीर केली आहे. बहुधा हेच कारण असावे.या वेळेस मुलींमध्ये हिवाळी सुट्टीबद्दल विशेष उत्साहाचे वातावरण नव्हते, कारण त्यांना माहिती होते की जर तालिबानने फतव्याची अंमलबजावणी केली, तर त्या काही पुन्हा शाळेत येऊ शकणार नाहीत. काही मुलींना आशा वाटत होती की शाळा फेब्रुवारीत सुरू होईल, पण उरलेल्या म्हणत होत्या की शिक्षणासाठी त्यांचे पालक स्वात सोडून अन्य कुठल्या तरी शहरात स्थायिक होतील.आज शाळेचा शेवटचा दिवस असल्यामुळे आम्ही ठरवले होते की, मैदानात उशिरापर्यंत खेळायचे. मला आशा वाटते आहे की, एक दिवस आपली शाळा नक्की उघडेल.. पण तरीही निघण्यापूर्वी मी शाळेची इमारत पाहून घेतली.. जाणो कदाचित इथे मी परत कधीच येणार नाही.




गुरुवार, जानेवारी १५ : बॉम्बगोळ्यांच्या आवाजाने दणाणलेली रात्र



कालची रात्र बॉम्बगोळ्यांच्या आवाजाने दणाणली होती. मी तीन वेळा जागी झाले. अर्थात दुसऱ्या दिवशी शाळा नसल्यामुळे मी आरामात १० वाजता उठले. नंतर माझी मैत्रीण आली आम्ही गृहपाठाबद्दल बोलत बसलो.आज १५ जानेवारी. तालिबानच्या फतव्याची अंमलबजावणी होण्याचा आदला दिवस; आणि माझी मैत्रीण मात्र गृहपाठाबद्दल असे काही बोलत होती की जणू काही घडलेच नाही.आजच मी लिहीत असलेली दैनंदिनी वृत्तपत्रात छापलेली मला पाहायला मिळाली. गुल मकाई या टोपण नावाने छापला गेलेला मजकूर आईला खूप आवडला. ‘आपण हिचे नाव बदलून गुल मकाई हेच ठेवूया का?’ आई बाबांना म्हणाली. खरे तर मलाही हे माझे नवे नाव आवडले.बाबांना काही दिवसांपूर्वी कोणीतरी डायरीचे प्रिंट आऊट्स दाखवले म्हणाले, ‘किती छान लिहिले आहे हे.’ माझ्या बाबांनी संमतीदर्शक स्मितहास्य केले, पण हे माझ्याच मुलीने लिहिले आहे हे काही ते सांगू शकले नाहीत.
(लोकसत्ताचतुरंग दि. शनिवार, २१ मार्च २००९)




उत्तरार्ध-




शुक्रवार, जानेवारी १६ :पोलिसांचा मागमूस नाही.



माझे बाबा तर म्हणाले होते की सरकार तुमच्या शाळेचे रक्षण करील. पंतप्रधानांनीही या मुद्दय़ावर लक्ष घालण्याचे ठरवले आहे. मला सुरुवातीला खूप आनंद झाला होता. पण मला आता समजले आहे की या समस्यांवर सहजासहजी उत्तरे मिळणार नाहीत. इथे स्वातमध्ये रोज ऐकायला मिळते की अमुक इतके सैनिक ठार मारले किंवा अमुक इतक्या सैनिकांचे अपहरण केले. पण आसपास पोलिसांचा मागमूसही दिसत नाही.माझे आई-बाबा तर खूपच घाबरले आहेत. ते म्हणाले की, जोपर्यंत तालिबान त्यांच्या एफ.एम. चॅनलवरून मुलींना शाळेत जाण्याची परवानगी आहे असे घोषित करीत नाहीत, तोपर्यंत आम्ही काही तुला शाळेत पाठवणार नाही.आज माझ्या परिसरातला एक मुलगा शाळेत गेला होता. मुख्याध्यापकांनी त्याला सांगितले की, लगेच घरी जा, कारण लवकरच संचारबंदी जाहीर होणार आहे. पण तो घरी आल्यावर लक्षात आले की, संचारबंदी जाहीर झालीच नाही. त्यांची शाळा बंद असण्याचे खरे कारण होते की शाळेजवळच्या रस्त्यावरून आर्मी जाणार होती.




सोमवार, जानेवारी १९ :सैन्य बसलंय खंदकात



आणखी पाच शाळा उद्ध्वस्त केल्या. त्यातली एक तर आमच्या घराच्या जवळच होती. मला नवल वाटते की त्या शाळा बंद असूनही का उद्ध्वस्त केल्या? तालिबानने दिलेल्या डेडलाइननंतर कोणीही तिथे गेले नव्हते.आज मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले होते. तिने मला सांगितले की काही दिवसांपूर्वी मौलाना शाह दौरानच्या काकाला कोणीतरी मारून टाकले. माझी मैत्रीण म्हणाली की, त्याचा राग म्हणून तालिबानने शाळा उद्ध्वस्त केल्या.ती म्हणाली की, तालिबानला कोणीही त्रास दिला नव्हता, पण या घटनेमुळे त्यांचा राग त्यांनी शाळांवर काढला. आर्मी मात्र हे सगळे होऊनही काहीच का करीत नाही? म्हणे ते टेकडीवरील खंदकात बसून आहेत बकरे मारून मजेत फस्त करीत आहेत.




गुरुवार, जानेवारी, २२ :अत्यंत धोकादायक परिस्थिती



शाळा बंद झाल्यानंतर घरी बसून बसून मला खूप कंटाळा आलाय. इथल्या धोकादायक परिस्थितीमुळे माझ्या काही मैत्रिणी स्वात सोडून अन्यत्र गेल्या आहेत. मी घर सोडून कुठेही बाहेर जाऊ शकले नाही. रात्री मौलाना शाह दौरानने (तालिबानी मौलवी, ज्याने मुलींनी शाळेत जाण्याच्या विरोधात फतवा जाहीर केला.) त्याच्या एफ.एम. रेडिओवरून पुन्हा इशारा दिला की, महिलांनी घराबाहेर पडू नये. त्याने असाही इशारा दिला की ज्या शाळा पाकिस्तानी सुरक्षा दलांना त्यांच्या शाळा सुरक्षा चौक्या बनविण्यासाठी देतील, त्या शाळाही उद्ध्वस्त केल्या जातील.बाबा तर म्हणाले की, हाजी बाबा विभागातील मुलांच्या मुलींच्या शाळांत सुरक्षा दल आधीच आले आहे. देवा रे, त्या सर्वाना सुखरूप ठेव! मौलाना शाह दौरानने त्याच्या एफ.एम. रेडिओवरून भाषणात सांगितले की, तीन चोरांना पकडण्यात आले असून उद्या त्यांना फटक्यांची शिक्षा दिली जाईल. ज्यांना ते बघायचे असेल, त्यांनी उद्या हजर राहावे.मला आश्चर्य वाटते की आम्हाला एवढे सहन करावे लागत आहे तरी लोक अशा गोष्टी बघायला जातात तरी कसे? आणि पाकिस्तानी सैन्य तरी असल्या गोष्टी खपवून घेते कसे? ते त्यांना थांबवत का नाहीत? माझ्या एक लक्षात आले आहे की जिथे जिथे पाकिस्तानी सैनिक असतील तिथे तालिबानी पोहोचतातच, पण जिथे तालिबानी आहेत त्या ठिकाणी सैन्य पोहोचेलच असे नाही!




शनिवार, २४ जानेवारी :गुणवंताचे नाव फलकावर लागणार नाही



खरे तर दर सुट्टीनंतर आमच्या वार्षिक परीक्षा असतात, पण जोपर्यंत मुलींच्या शाळेत जाण्याला तालिबान परवानगी देत नाही, तोपर्यंत तरी यंदा ते शक्य होणार नाही. आम्हाला परीक्षेसाठी काही धडे तयार करायला सांगितले आहे, पण माझे अभ्यासात मनच लागत नाही.कालपासून पाकिस्तानी सैन्याने सर्व शैक्षणिक संस्थांचा ताबा घेतला. ते संस्थांना संरक्षण देणार आहेत. बघा, म्हणजे डझनावारी शाळा उद्ध्वस्त केल्यानंतर आणि अशाच शेकडो बंद पडल्यानंतर सैन्याने त्यांच्या संरक्षणाचा विचार केलेला दिसतोय! त्यांनी हीच कारवाई धडपणे आणि वेळेवर केली असती तर ही वेळच आली नसती.मुस्लिम खान (स्वातमधील तालिबानचा प्रवक्ता) म्हणाला की, ज्या शाळांमध्ये सैन्याला थारा दिला जाईल, त्या शाळांवर तालिबान हल्ले करील. आम्हाला तर शाळेत आर्मी आल्यामुळे अधिकच भीती वाटू लागली आहे. आमच्या शाळेत एक फलक आहे. त्याला गुणवत्ता फलक म्हणतात. वार्षिक परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या मुलीचे नाव त्या फलकावर लिहिले जाते. मला तर वाटू लागले आहे की, यंदा त्या फलकावर कुठलेच नाव लागणार नाही..




सोमवार, जानेवारी २६ : हेलिकॉप्टरमधून गोळ्या-चॉकलेट



बॉम्बगोळ्यांच्या स्फोटांच्या भीषण आवाजाने मी जागी झाले. सुरुवातीस तर आम्ही हेलिकॉप्टरच्या आवाजानेच भयभीत होत असू आणि आता तर हा बॉम्बस्फोटांचा आवाज! मला आठवते सैन्याची कारवाई सुरू झाली तेव्हा आलेल्या हेलिकॉप्टरच्या आवाजाची मला खूप भीती वाटायची. मी लपून बसायचे. आमच्या आजूबाजूची मुलेही खूप घाबरायची हेलिकॉप्टरला.एक दिवस हेलिकॉप्टरमधून गोळ्या-चॉकलेट्स टाकण्यात आली. पुढले काही दिवस त्यांचे गोळ्या-चॉकलेट्स टाकणे सुरूच राहिले. आता जेव्हा जेव्हा हेलिकॉप्टरचा आवाज येतो तेव्हा आम्ही त्याच्यातून गोळ्या-चॉकलेट्स पडण्याची खूप वाट पाहतो, पण हल्ली तसे काही घडतच नाही. आता काही काळापूर्वीच माझ्या बाबांनी आम्हाला एक आनंदाची बातमी सांगितली. ते म्हणाले, मी उद्या तुम्हा सर्वानाच येथून इस्लामाबादला घेऊन जाणार आहे. आम्हाला सर्वाना खूप आनंद झाला आहे.



बुधवार, जानेवारी २८ : आई-बाबांच्या डोळ्यांत अश्रू



माझ्या बाबांनी कबूल केल्याप्रमाणे आम्ही काल इस्लामाबादला पोहोचलो. स्वातमधून निघाल्यानंतर येथे पोहोचेपर्यंत मला खूप भीती वाटत होती. असे ऐकले होते की, जाणाऱ्यांची तालिबानी झडती घेतात. तसे काहीच आमच्या बाबतीत घडले नाही. उलट सैन्यानेच आमची झडती घेतली. ज्या क्षणी आम्ही स्वातची सीमा ओलांडली, त्या क्षणी आमची भीती मावळून गेली.आम्ही इस्लामाबादमध्ये आमच्या बाबांच्या एका मित्राकडे राहत आहोत. मी या शहरात पहिल्यांदाच आले आहे. छान छान बंगले, रुंद रस्ते.. खूपच चांगले आहे हे शहर. पण माझ्या स्वातच्या तुलनेत येथे नैसर्गिक सौंदर्याची मात्र वानवा आहे. बाबा आम्हांला येथील लोकविरसा संग्रहालयात घेऊन गेले. तेथे मला खूप नवे शिकायला मिळाले. आमच्या स्वातमध्येही असेच संग्रहालय आहे, पण या धुमश्चक्रीत ते धड शिल्लक राहील की नाही हेच समजत नाही.लोकविरसा संग्रहालयाजवळच्या एका वयस्क माणसाकडून बाबांनी माझ्यासाठी पॉपकॉर्न घेतले. तो विक्रेता जेव्हा आमच्याशी पश्तू भाषेत बोलला, तेव्हा बाबांनी त्याला विचारले की, तुम्ही इस्लामाबादचेच आहात का? तेव्हा तो वयस्कर माणूस म्हणाला, ‘‘इस्लामाबाद कधी तरी पश्तून माणसाचे असू शकते का?’’ त्याने सांगितले, ‘‘मी महमद एजन्सी या भागातला असून सध्या तेथे सुरू असलेल्या सैनिकी कारवायांमुळे मला स्वत:चा आसरा सोडून या शहरात नाईलाजाने यावे लागले आहे.’’ त्याने हे वाक्य उच्चारले आणि त्या क्षणी मी माझ्या आई-बाबांच्या डोळ्यांत अश्रू तरळलेले पाहिले.
(लोकसत्ताचतुरंग दि. शनिवार, २८ मार्च २००९)